Thursday 27 October 2011

तेवढ्या दर्शनाने




हात उंचावुन माझी फुले स्वागतास जातील
त्याक्षणी मी असेन की नसेन कोणास ठाऊक?
जेव्हा तारे आप्त म्हणुन माझ्या घरी येतील
उभा दारी असेन नसेन कोणास ठाऊक?

येणारया नवरचनेस माझाही सलाम सांगा
ह्याच भव्य क्षणासाठी उभी हयात जाळली
काहीजण लोहघण हाती धरुन उठलो
बंडाव्याची कोटी बीजे याच भूमीत पेरली

ऋतुंनो ,वारयांनो, फुलांनो, नाजुक परयांनो
जेव्हा या देशात याल कदाचित मी नसेन
आताच तुमच्या हालचाली शब्दांत येतात
तेवढ्या दर्शनानेच मी पुलकित पावेन.
                                              - नारायण सुर्वे