Monday 7 November 2011

न्याय

येमेल्यान पुगाचेव नावाच्या रशियन बंडखोराने झारिना केथेरिन दुसरी हिच्या काळात त्याच्या शूर सैनिकांच्या साथीने बंड केले होते. या बंडाचा क्रुरपणे बीमोड केला गेला व पुगाचेवला फासावर चढवले. त्या वेळच्या शेतकरयांमध्ये एक गाणे अतिशय लोकप्रिय होते.(अलेक्झांडर पुश्किनने या बंडाचा इतिहास 'THE HISTORY OF PUGACHOV' या ग्रंथात लिहिला आहे. तसेच या बंडातील काही प्रमुख घटनांचा उल्लेख त्याने आपल्या 'THE CAPTAIN'S DAUGHTER' या कादंबरीमध्ये केला आहे.)

अंधारकोठडीत डांबलेला बंडखोर शेतकरी म्हणतो-

उद्या पहाटे माझा न्याय होणार....
त्या भयंकर न्यायाधीशाआधी झार,
प्रत्यक्ष झार सम्राट मला विचारणार.
सांग, शेतकरयाच्या मुला, खरेखुरे सांग,
कोण होते तुझ्या संगे करित लुटमार?
किती गडी तुझ्या टोळीत, थोडे की बेसुमार?
मी सांगतो राजाधिराज, न्यायी झार,
खरेखुरे सांगतो, सांगुन टाकतो पार
फक्त चार माझे साथीदार
एक रात्र अंधारी काळीशार
दुसरी माझ्या तलवारीची धार
तिसरा माझा घोडा प्यारा
आणि चौथा तंग तीर कामठा
दूतांसारखे तीर धारदार.
मग पुन्हा बोलेल न्यायी झार,
शाब्बास, तू भुमीपुत्र शूर
तुला चांगले ठाऊक, कसे लुटायचे
अन कसे द्यायचे उत्तर
मी खूष बेटा, घे तुला बक्षीस :
खुल्या खुल्या मैदानात उंचच उंच घर
एक आडवी फळी दोन दणकट खांबांवर....
(शेवटच्या ओळीचा अर्थ म्हणजे फाशीचे तख्त हे सांगायला नकोच.)